बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब; यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर नसणार VIVO


आयपीएलच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे घरीच असलेले भारतीय तसेच परदेशी क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुक्ता आहे. पण बीसीसीआयचे यावरुन एकीकडे कौतुक होत असतानाच दूसरीकडे क्रिकेट चाहत्यांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, Vivo हे टायटल स्पॉन्सर असतील, अशी त्यांनी त्याचवेळी केलेली घोषणा अनेकांना न पटणारी होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयपीएलवर बहिष्कार घाला, चिनी कंपनी Vivoवर बहिष्कार घाला असा ट्रेंड सुरू होता. पण, आता आयपीएलसोबतचा Vivoचा करार मोडला असल्याची अधिकृत घोषणा आज बीसीसीआयने केली.

2017मध्ये 2199 कोटींत Vivo India ने आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार एका वर्षाला Vivoकडून आयपीएलला 440 कोटी मिळतात. यापूर्वी आयपीएलची पेप्सिको ही कंपनी टायटल स्पॉन्सर होती आणि 2016मध्ये त्यांनी 396 कोटी रुपये दिले होते. पण अद्यापही तीन वर्षांचा Vivoचा करार शिल्लक आहे. बीसीसीआयनं सांगितले की, यंदा इंडियन प्रीमिअर लीगमधील भागीदारी बीसीसीआय आणि VIVO mobile India Pvt Ltd यांनी निलंबित करण्याचे ठरवले आहे.

दरम्यान सीमेवरील भारत-चीन या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे आपल्या देशात चिनी वस्तूंवर बहिष्काराची मागणी सातत्याने होत आहे. अशातच टायटल स्पॉन्सर म्हणून VIVO कायम राहणार असल्याची घोषणा आयपीएलने केल्यामुळे बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर VIVOने स्वतः माघार घेताना यंदाच्या आयपीएलमध्ये टायटल स्पॉन्सरवरून माघार घेतल्यामुळे आता बीसीसीआयची कोंडी झाली आहे. VIVOने घेतलेल्या माघारीमुळे बीसीसीआयला 440 कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे नवा टायटल स्पॉन्सर मिळवण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरू झाली आहे. यात रिलायन्स जिओ हे नाव आघाडीवर असले तरी त्यांना आणखी दोघांकडून टक्कर मिळू शकते.