संशोधक सांगतात या दरम्यान बाजारात उपलब्ध होईल कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई : अवघ्या जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी सर्वचजण प्रार्थना करत आहेत. त्याचबरोबर जगभरातील संशोधक या रोगाचा समूळ नाश करणारे औषध शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करुन मेहनत घेत आहेत. याच दरम्यान भारतातील पहिल्या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा नागपुरात झाला असून आगामी पाच ते सहा महिन्यात ही लस बाजारात येण्याचा विश्वास संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे.

भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ या लसीचा पहिला डोस नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात 55 स्वयंसेवकांना देऊन सात दिवस पूर्ण झाले असून 55 स्वयंसेवकांपैकी कोणालाही या सात दिवसात कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती आहे. या स्वयंसेवकांमध्ये किती अँटीबॉडीज वाढल्या, याची तपासणी पुढील एक दोन दिवसात होणार आहे. त्यानंतर सोमवारपासून याच स्वयंसेवकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार, अशी माहिती कोवॅक्सिनची मानवी चाचणी करणारे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.

डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना लसीचे सकारात्मक परिणाम असल्याचा विश्वासही व्यक्त केला. आगामी पाच ते सहा महिन्यात स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येऊ शकते, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पहिल्यांदा भारत बायोटेक कंपनीने कोराना प्रतिबंधक लस तयार केली. केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी या लसीला परवानगीही मिळाल्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियेचा पहिला टप्पाही यशस्विरित्या पार पडला आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. कोवॅक्सिन (Covaxin) असे भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचे नाव आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली.