चीनविरोधात उभे राहणे तर सोडाच, पंतप्रधानांकडे चीनचे नाव घेण्याची देखील हिंमत नाही – राहुल गांधी

संरक्षण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर एक कागदपत्र अपलोड केले होते. यानुसार, लडाखच्या अनेक भागात चीनी सैन्याच्या आक्रमणाच्या घटना वाढल्या आहेत. मात्र नंतर चीनचे आक्रमण मान्य करणारे हे कागदपत्र मंत्रालयाने वेबसाईटवरून हटवले. मंत्रालयाकडून ही कागदपत्रे हटवल्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, चीनच्या विरोधात उभे राहायचे तर सोडाच, भारताच्या पंतप्रधानांकडे त्यांचे नाव घेण्याची देखील हिंमत नाही. चीन आपल्या भागात असल्याची गोष्ट मान्य न करणे आणि वेबसाईटवरून कागदपत्रे हटवल्याने तथ्य बदलत नाहीत.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर एलएसीवर चीनचे अतिक्रमण या शीर्षकाखाली एक कागदपत्र अपलोड केले होते. यात म्हटले होते की, 5 मे पासून चीन वारंवार आपले अतिक्रमण वाढवत चालला आहे. खासकरून गलवान खोऱ्यात. चीनने 17, 18 मे ला लडाखमधील कुंगरांग नाला, गोगरा आणि पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर अतिक्रमण केले. भारत-चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षाचाही यात उल्लेख करण्यात आला होता.