खासदार नवनीत राणा यांना देखील कोरोनाची लागण


अमरावती – खासदार नवनीत राणा या देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असून नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना चार दिवस आधी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. तर मुलांची काळजी घेण्यासाठी नवनीत राणा घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

दरम्यान राणा कुटुंबातील ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. नवनीत राणांच्या कुटुंबाबाबत ही माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगरमध्ये असलेल्या त्यांच्या घरी गर्दी जमा झाली होती. पण त्यावेळी आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले होते.