काश्मीर मुद्यावरुन सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडले चीन-पाकिस्तान


नवी दिल्ली – भारताने आज काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला चांगलेच फटकारले असून चीनचा आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप अजिबात मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. भारताचा अंतर्गत विषय उपस्थित करण्याचा चीनने पहिल्यांदाच प्रयत्न केलेला नाही. चीनच्या अशा प्रयत्नांना यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानने बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनच्या समर्थनाने काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला कालच एक वर्ष पूर्ण झाले, पण चीन-पाकिस्तानचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असताना चीनने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला.