मुंबई पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत बिहार पोलीस


पाटणा – सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे मुंबई पोलिसांवर कायदेशीर मार्गाने बिहार पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी ही माहिती दिली आहे. पाटणा येथे सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत पोहोतचात त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

अद्यापही आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. घरकैदेत ठेवल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हा देखील एक पर्याय असल्याचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान काल सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय अव्यवहार्य असल्याचे निरीक्षण नोंदवल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय योग्य असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तर दुसरीकडे विनय तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन करण्यात आल्याचा आरोप गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. दरम्यान काल आपण महाराष्ट्र पोलिसांना विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून शिथीलता देण्याची विनंती केली होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

एक दिवस आम्ही अजून वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करु. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान सीबीआयकडे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर बिहार पोलीस मुंबई सोडून रवाना झाले आहेत. चार पोलीस अधिकारी आज मुंबईतून बिहारसाठी रवाना झाले. पण यावेळी पोलिस अधीक्षक विनय तिवारी मुंबईतच क्वारंटाइन राहणार आहेत.