चीनमध्ये आणखी एका नव्या व्हायरसचा शिरकाव; सात जणांचा मृत्यू तर ६० जणांना संसर्ग


बिजिंग – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगासमोर संकटांचा डोंगर उभा राहिलेला आहे. संपूर्ण जगाला चीनमधील हुआन प्रांतातून फैलाव झालेल्या कोरोनाने विळखा घातला आहे. त्यातच अनेक देश कोरोनावरील लस किंवा औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच चीनमधून अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये अजून एका संसर्गजन्य आजाराने (SFTS) शिरकाव केला असून या आजारामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जणांना संसर्ग झाला असल्याचे वृत्त ग्लोबल टाइम्सने दिले आहे.

संसर्गजन्य असा हा आजार असल्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची भीती आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे. या आजाराचा संसर्ग वर्षाच्या सुरुवातीला जिआंगसू प्रांतातील ३७ लोकांना झाल्याचे समोर आल्यानंतर याच पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातील २३ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताप आणि खोकला ही लक्षणे या आजाराची लागण झालेल्या जिआंगसू प्रांतातील महिलेमध्ये जाणवत होती. महिलेची डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेमध्ये पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निदर्शनास आले. एक महिना उपचार केल्यानंतर महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या आजारामुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

SFTS हा व्हायरस तसा चीनसाठी नवा नाही. चीनला यासंबंधीची माहिती २०११ मध्येच मिळाली होती. पण कोरोना संकट असतानाच या आजाराची लागण होत असल्याने चीनची चिंता वाढू लागली आहे. हा आजार किटकांपासून फैलावत असल्याची शंका विषाणूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो, असे सांगितले आहे.