.. म्हणून अमिताभ बच्चन यांना मागावी लागली प्रसुन जोशींची माफी

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपुर्वीच कोरोनावर मात केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे अमिताभ बच्चन अनेकदा आपले वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कविता शेअर करत असतात. काल देखील त्यांनी अशाच प्रकारे ‘अकेलेपन का बल पहचान’ नावाची एक कविता आपल्या वडिलांच्या नावाने शेअर केली होती. मात्र ही कविता शेअर करताना त्यांच्याकडून छोटीशी चूक झाली. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांना आता या चुकीवरून माफी देखील मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी 5 ऑगस्टला ‘अकेलेपन का बल पहचान’ ही कविता शेअर करत ही कविता हरिवंश राय बच्चन यांची असल्याचे म्हटले होते. मात्र ही कविता प्रसिद्ध कवी, गीतकार प्रसून जोशी यांची होती. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर बच्चन यांनी आता याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली.

बच्चन यांनी ट्विट केले की, काल जी कविता T 3617 वर छापली होती, त्याचे लेखक बाबूजी नाही. ते चुकीचे होते. त्याची रचना कवी प्रसून जोशी यांनी केली आहे. यासाठी मी क्षमा मागतो.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन अद्याप हॉस्पिटलमध्येच आहे.