फेसबुकने डिलीट केली डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोनासंदर्भात भटकवणारी पोस्ट


वॉशिंग्टन – अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी आधीपासूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली असतानाच आता त्यांच्याविरोधात सोशल मिडियाने देखील कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता फेसबुकने ट्रम्प यांची कोरोना व्हायरसबाबत भटकवणारी पोस्टच उडविली आहे.

कोरोनाबाबत अफवा पसरवण्यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. फेसबुकने अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना बनविली असून त्यानुसार अशा भटकवणाऱ्या पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील आज त्याचा प्रत्यय आला आहे.

दरम्यान ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक अभ्यासांमध्ये कोरोनाची बाधा लहान मुलांना कमी प्रमाणात होते, लहान मुले कोरोनाशी लढण्यास आधीपासूनच सक्षम किंवा ते वृद्धांपेक्षा जास्त ताकदवर आहेत असे म्हटले होते. ट्रम्प यांनी हे वक्तव्य फॉक्स न्यूजवर केले होते. पण, ते त्यांना सिद्ध करता आलेले नाही. मुलांमधील कोरोना व्हायरसच्या प्रतिकारशक्तीवर ट्रम्प यांची पोस्ट होती. त्यांनी याचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. यामुळे ती पोस्ट फेसबुककडून डिलीट करण्यात आली. असून यावर स्पष्टीकरण फेसबुकने देताना एक गट कोरोनाशी लढण्यास म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचा दावा करणे आमच्या पॉलिसीविरोधात आहे. कोरोनासंबंधी चुकीची माहिती अशा प्रकारची पोस्ट पसरविते. त्यामुळेच ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे ट्विटरने देखील फेसबुकसारखीच कारवाई केली आहे. ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट ट्विटरने याच पोस्टवरून काही काळासाठी ब्लॉक केले आहे. हे ट्विट ट्रम्प यांनी रिट्विट केले आहे. ट्रम्प प्रचाराच्य़ा अकाऊंटला हे ट्विट ट्विटरने डिलीट करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत या अकाऊंटवरून कोणतेही नवीन ट्विट पोस्ट करता येणार नाही. ट्विटर अशाप्रकारचे पाऊल अन्य पोस्टबाबतही उचलते. ते युजरला यासाठी वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यास सांगतात.