चीनला आणखी एक दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

चीनवर एकामागोमाग डिजिटिल स्ट्राईकच्या घटना मागील काही दिवसात सुरूच आहे. आधी भारताने 59 चीनी अ‍ॅप हटवत चीनला दणका दिला होता. अमेरिका देखील चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यातच आता गुगलने चीनशी संबंधित असलेले जवळपास 2500 युट्यूब चॅनेल डिलिट केले आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून खोटी व भ्रामक माहिती पसरवली जात असल्याने हे चॅनेल हटविण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे.

कंपनीने सांगितले की, या चॅनेल्सला एप्रिल ते जून या कालावधीमध्ये युट्यूबवरून हटविण्यात आलेले आहे. असे चीनसंदर्भात सुरू असलेल्या इन्फ्लूएंस ऑपरेशन्स अंतर्गत करण्यात आले आहे. युट्यूबने सांगितले की सर्वसाधारणपणे यावर स्पॅम, नॉन पॉलिटिकल काँटेंट पोस्ट केला जात होता. मात्र सोबतच राजकारणाशी संबंधित माहिती देखील पोस्ट केली जात असे.

गुगलने मात्र या चॅनेल्सच्या नावांचा खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने सांगितले की ट्विटरवर देखील अशीच एक्टिव्हिटी असणारे काही लिंक पाहण्यात आले आहेत. सोशल मीडिया एनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने यासंदर्भात माहिती दिली.