जागतिक आरोग्य संघटनेने उपस्थित केली रशियाच्या कोरोना लसीच्या दाव्यावर शंका


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासमोर संपूर्ण जग हतबल झाले असून अशा संकट काळात कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनास रशियाने ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात करणार असल्याचे सांगत जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यातच आता रशियाने लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याच्या शर्यतीत बाजी मारल्याच्या चर्चा सर्वाच माध्यमांमध्ये सुरू असतानाच आता याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासोबतच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही सुरू राहील, असे रशियाने म्हटले होते. याच दरम्यान कोरोनावरील लस विकसित करण्याच्या रशियाच्या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थित केली आहे. कोरोनावरील लसीच्या उत्पादनासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सूचना रशियाला जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाविरोधात व्यापक प्रमाणावर रशिया लसमोहीम सुरू करणार असल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. तसेच ही लस पूर्णपणे मोफत असेल आणि पहिल्या टप्प्यात याचा पहिला डोस डॉक्टर्स आणि शिक्षकांना देण्यात येईल. त्याचबरोबरच या लसीची चाचणीही सुरू राहणार असून, त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्नही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या येतील तेव्हा आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल, असे डब्ल्यूएचओचे प्रवक्ते क्रिस्टियन लिंडमियर यांनी सांगितले. याबाबत लिंडमियर म्हणाले की, जेव्हा संशोधक आपण महत्त्वपूर्ण शोध घेतल्याचा दावा करतात तेव्हा ती खरोखरच चांगली बातमी असते. पण दावा आणि वास्तव यात फरक चाचण्यांच्या अनेक टप्प्यांमधून गेल्यानंतर दिसून येतो. रशियाच्या लसीबाबत अद्याप आम्हाला अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर अधिकृतरित्या याबाबत काही समजले असते तर त्यावर आमच्या युरोपमधील कार्यालयातील सहकाऱ्यांनी लक्ष दिले असते.

सुरक्षितरीत्या लस विकसित करण्याचे काही नियम आहेत आणि त्यासंदर्भात एक मार्गदर्शक तत्त्वदेखील आहे. त्याचे पालन योग्यरित्या झाले पाहिजे, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळेच आपल्याला संबंधित उपचार किंवा लसीमुळे काही अपाय होतात का किंवा याच्या वापरामुळे फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते का याची माहिती मिळू शकते.

वैद्यकीय चाचण्यांमधून जात असलेल्या २५ लसींची यादी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर तयार केली आहे. तर उर्वरित १३९ लसी या प्री-क्लीनिकल टप्प्यात आहेत. सध्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मोजक्याच लसींचा समावेश झाला आहे. पण रशियाने विकसित केलेल्या लसीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला नाही. आतापर्यंत ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, अमेरिकेतील मॉडर्ना आणि चीनमधील सिनोव्हॅक या लसी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत.

तर रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार १८ जून रोजी या लसीची सेचेनोव्ह मेडिकल विद्यापीठाने पहिली चाचणी घेतली. तर दुसरी चाचणी २३ जून रोजी घेतल्याचा दावा केला आहे. पण या लसीसाठीचे संशोधन आणि टाइम फ्रेम पाहता ही लस पहिल्या टप्प्यातच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. कुठल्याही आजारावरील लस विकसित करण्याची दीर्घकालीन प्रक्रिया असते. लस बाजारात आणण्यापूर्वी ती पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याचीही शहानिशा केली जाते. केव्हा केव्हा तर १० वर्षे किंवा त्याहून अधिकचा कालावधी देखील लागतो.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करण्यात येऊ नये. लसीमध्ये झालेली किरकोळ चूक लाखो लोकांच्या जीवाला अपाय पोहचवू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याचदम्यान अनेक संशोधकांनी या वर्षाच्या अखेरीपर्यंत किंवा २०२१ च्या सुरुवातीला कोरोनावरील लस येईल, असा दावा केला आहे.