२९ वर्षांपूर्वी मोदींनी दिलेला ‘तो’ शब्द झाला पूर्ण


अयोध्या – आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि त्यांनी २९ वर्षांपूर्वी दिलेला तो शब्द पूर्ण झाला आहे. १९९१ मध्ये २९ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी यावेळी जेव्हा राम मंदिर उभे राहील तेव्हाच आपण पुन्हा अयोध्येत येऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार आता तब्बल २९ वर्षांनंतर नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले. योगायोगाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने भूमिपूजनाचा मानही त्यांनाच मिळाला आहे.

१९९१ मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. तेव्हा महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेल्या फोटोत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदीदेखील कॅमेऱ्यात कैद झाले होते. भाजपचा नरेंद्र मोदी हे मुख्य चेहरा म्हणून समोर आल्यानंतर हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेसाठी फोटोग्राफर म्हणून महेंद्र त्रिपाठी काम करत होते. त्यांचा स्टुडिओ रामजन्मभूमीजवळच होता.

नरेंद्र मोदी अयोध्येत ‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने दाखल झाले होते. कन्याकुमारीमधून ही यात्रा सुरु झाली होती. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधितही केले होते. त्यावेळी महेंद्र त्रिपाठी यांनी मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असे विचारले असता ज्या दिवशी राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, तेव्हा मी पुन्हा येईन असे उत्तर दिले होते. त्यानुसार नरेंद्र मोदी २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेले ते आश्वासन पूर्ण करत असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत हजर झाले.