संकटाच्या चक्रव्युहातून मुक्त झाली रामजन्मभूमी – नरेंद्र मोदी


अयोध्या – राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले. आज संपूर्ण जगभरात प्रभू रामाचा जयघोष होत असल्याचे सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सियावर रामचंद्र की जय या घोषणेने सुरुवात केली.

नरेंद्र मोदींनी यावेळी शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेल्याचे सांगितले. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारले हे सांगताना रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. आज कित्येक दशकांची प्रतिक्षा संपत आहे. आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर करोडो लोकांचा विश्वासच बसत नसेल, असे नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाल्याचेही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे हे राम मंदिर आधुनिक प्रतिक असेल. याशिवाय कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचे प्रतिक असेल, असं नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. हे मंदिर येणाऱ्या पिढीसाठी आस्थेचे प्रतिक असेल, असेही ते म्हणाले. आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा राम मंदिराकडून मिळत राहील, असेही त्यांनी म्हटले.

अनेक पिढ्यांनी आपले आयुष्य राम मंदिरासाठी अर्पण केले. राम मंदिरसाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो. या मंदिरासोबत फक्त इतिहास रचला जात नसून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर कोरोनाच्या संकटकाळात मर्यादा आल्या आहेत. जी मर्यादा प्रभू श्रीरामाच्या कामात अपेक्षित असते, त्या मर्यादेचे दर्शन या कार्यक्रमात दिसत आहे. ही मर्यादा देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही दिसल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. माणुसकीने जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्रांना मान्य केले आहे, तेव्हा विकास झाला आहे. जेव्हा आपण भटकलो आहोत, तेव्हा विनाश झाला. सर्वांच्या भावनांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन, विश्वास घेऊन विकास करायचा असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.