3 तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढले 24 किलोंचे ट्यूमर, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मेघालयाच्या वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून तब्बल 24 किलोंचा ट्यूमर काढला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 37 वर्षीय महिलेच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्याने 29 जुलैला तुरा प्रसुति आणि बाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. इसिल्डा संगमा यांनी सांगितले की 3 ऑगस्टला दोन प्रसुति विशेषज्ञांसह डॉक्टरांच्या एका टीमने यशस्वी ऑपरेशन केले. तीन तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये 24 किलोचे ट्यूमर पोटातून काढण्यात आले.

डॉ. इसिल्डा संगमा यांनी सांगितले की, आता रुग्णाची प्रकृती ठीक आहे व डॉक्टर त्यांच्याकडे लक्ष देत आहेत. ट्यूमरला बायोप्सीसाठी पाठविण्यात आले असून, याद्वारे समजू शकेल की कॅन्सर तर नाही. एका डॉक्टराने रुग्णाला रक्त देखील दिले. तसेच अनेकांनी या ऑपरेशनच्या खर्चासाठी आर्थिक मदत केली.

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी देखील यशस्वी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. सोबतच रुग्णाला लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.