या व्यक्तीने सिगरेट सोडत 8 वर्षात वाचवले 5 लाख, बचतीच्या पैशांनी करणार हे काम

सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन लागल्यावर ते सोडणे अशक्य आहे असे म्हटले जाते. कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा त्याची इच्छा होते, असे अनेकजण सांगतात. मात्र यातही काहीजण असे असतात, जे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या सर्व व्यसनांवर मात करतात. असेच काहीसे केरळमधील एका 75 वर्षीय व्यक्तीने केले आहे.

केरळमध्ये राहणारे वेणुगोपालन नायर हे आपल्या आयुष्यातील जवळपास 50 वर्ष सिगरेट पीत होते. या काळात त्यांनी पैसा आणि आरोग्य या दोन्हींचे नुकसान केले. मात्र त्यांना वेळीच आपल्या चुकांची जाणीव झाली व त्यांनी सिगरेट सोडण्याचा निर्धार केला. यातील खास गोष्ट अशी की 8 वर्षांपासून सिगरेट न पीत त्यांनी त्याच पैशांची बचत करत 5 लाख रुपये जमवले आहेत.

वेणुगोपालन यांनी सांगितले की, ते 13 वर्षांचे असल्यापासून धुम्रपान करत आहेत. मात्र वयाच्या 67 व्या वर्षी त्यांना याचे परिणाम जाणवले. त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी सिगरेट सोडली.

या पैशातून त्यांनी बचत करत 5 लाख रुपये जमवले आहेत व आता या बचतीतून ते आपल्या जुन्या घराचे बांधकाम करणार आहेत. सोबतच आपल्या पत्नी आणि दोन मुलांच्या भविष्यासाठी थोडीफार बचत करण्याची देखील त्यांची योजना आहे.