आयपीएल : संघांना हवी ‘कॉन्टॅक्टलेस’ जेवणाची डिलिव्हरी, 6 दिवस राहावे लागणार आयसोलेशनमध्ये !

आयपीएलचा 13वा हंगाम यूएईमध्ये खेळला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना यूएईमध्ये काहीदिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले जावू शकते. मात्र संघांना सहा दिवसांच्या ऐवजी केवळ 3 दिवस आयसोलेशन हवे आहे. यासोबतच पुर्वसुचनेसह संघ आणि कौटुंबिक जेवणाच्या आयोजनासाठी बोर्डाच्या परवानगी देखील मागितली आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संघांनी हॉटेलच्या बाहेरून कॉन्टॅक्टलेस जेवणाच्या डिलिव्हरीची देखील परवानगी मागितली आहे. या संदर्भात संघ मालक आणि आयपीएल अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या एसओपीनुसार, खेळाडू आणि इतर स्टाफची आयसोलेशन दरम्यान पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी चाचणी केली जाईल. त्यानंतरच सरावाची परवानगी मिळेल. यानंतर देखील 53 दिवसांच्या या स्पर्धेत दर 5 दिवसांनी त्यांची चाचणी केली जाईल.

अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंनी मागील 6 महिन्यात क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे त्यांना अधिकाधिक सराव हवा आहे. आरोग्य तज्ञांच्या सल्ल्यावरून आयसोलेशनचा कालावधी सहा दिवसांच्या ऐवजी 3 दिवस केला जावू शकतो. बीसीसीआय संघांना 15 ऑगस्टला देखील यूएईला जाण्यासाठी परवानगी देऊ शकते.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. यूएईमध्ये खेळाडूंना आयसोलेशन दरम्यान संघातील इतर खेळाडूंशी बोलण्याची देखील परवानगी नसेल. तीन कोव्हिड चाचण्या झाल्यानंतरच असे करता येईल.