सुशांत मृत्यू प्रकरणात ईडीने रिया चक्रवर्तीला बजावले समन्स

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात आता सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीला समन्स बजावले आहे. प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याने ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची लांबलचक यादीच तयार केल्याचे सांगितले जात आहे. ईडीने रियाला तिच्या मुंबईमधील जुन्या पत्त्यावर आणि ईमेलद्वारे समन्स पाठवले आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ईडीची मुंबई शाखा रियाची तीन टप्प्यात चौकशी करेल. पहिल्या टप्प्यात वडिलांचे नाव, स्थानिक पत्ता आणि परिवारातील सदस्यांची माहिती मागितली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात पॅनकार्डची माहिती, कंपनीचा टिन नंबर, उत्पन्नाचे साधन, रिटर्नची माहिती, कंपनीच्या कामाची माहिती, कंपनीचे टर्नओव्हर, बँकेत किती खाती आहेत, एकूण किती संपत्ती, भावाचा उद्योग, पासपोर्ट या संदर्भात माहिती मागितली जावू शकते.

तिसऱ्या टप्प्यात रियाला सुशांतबाबत प्रश्न विचारले जावू शकतात. यात रियाचे सुशांतसोबतचे नाते, त्याचे कुटुंब, व्यवसाय याबाबत विचारपूस केली जावू शकते.

दरम्यान, याआधी ईडीने मनी लाँड्रिंगची तक्रार दाखल करत सुशांतचा चार्टड अकाउंटेंट संदीप श्रीधर आणि रियाचा चार्टड अकाउंट रितेश शाहची देखील चौकशी केली आहे.