अमेरिकेतही राममंदिराचा उत्साह, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला भव्य फोटो

अयोध्यनगरीत आज प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडला. मात्र केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेतही याचा उत्साह पाहण्यास मिळाला.

या ऐतिहासिक दिनानिमित्ताने अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या नागरिकांनी आनंद साजरा केला. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील बिलबोर्डवर देखील तिरंग्यासह प्रभू राम आणि राममंदिराचा भव्य असा फोटो झळकला. हा टाईम्स स्क्वेअरवरील सर्वात महागडा बिलबोर्ड असल्याचे सांगितले जाते. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा फोटो येथे झळकत राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये चांदीची विट ठेवून राम मंदिराची पायाभरणी केली. तर दुसरीकडे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय समुदायाच्या लोकांना पारंपारिक कपड्यांमध्ये आनंद साजरा केला. एवढेच नाही तर अमेरिका कॅपिटल हिल ते व्हाईट हाऊसपर्यंत रथयात्रा देखील काढली.