राहुल गांधी यांच्याकडून प्रभू रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित आज अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भूमिपूजन सोहळा पार पडताच एक ट्विट केले. त्यांनी त्या ट्विटमध्ये प्रभुरामचंद्रांच्या गुणांचे वर्णन त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की,

मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचे स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे.
राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही.
राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,
असे वर्णन राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

मंत्रोच्चाराच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी हनुमान गढी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले. सुरूवातीला त्यांचे अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.