५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी औषध


नवी दिल्ली – जगभरातील नागरिकांसाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनत आहे. त्यातच आपल्या देशात हजारो लोकांना दररोज कोरोनाची लागण होत आहे. पण याच दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जेवढ्या लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्याच्या दुपटीने लोक कोरोनावर मात करत आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे.

डेक्सामेथासोन, फेविपिराविर ही औषध काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरली जात आहेत. त्यातच आता कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांसाठी सन फार्मा कंपनीने फ्लूगार्ड नावाचे औषध लॉन्च केले आहे.

मंगळवारी फ्लूगार्ड ही टॅबलेट सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी लॉन्च केली आहे. या टॅबलेटची भारतीय बाजारात किंमत ३५ रुपये एवढी आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांना ही औषधे दिली जाणार आहेत.

हे औषध फेविपिराविरचे व्हर्जन असून फेविपरिविर हे एक मात्र असे औषध आहे, ज्या औषधाला भारतात एंटी व्हायरल ट्रिटमेंटसाठी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. फ्लूगार्ड टॅबलेटमध्ये २०० एमजीचा डोस आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.

फेविपिराविर हे औषध जपानी कंपनी फुजीफिल्म होल्डींग कॉर्प स्वस्तात तयार करते. एविगन नावाने हे औषध ही कंपनी विकते. या औषधांचा वापर इंफ्लुएंजाच्या उपचारांसाठी केला जातो. या औषधाचे मागील अनेक दिवसात कोरोना रुग्णांवर चांगले परिणाम दिसून आले आहेत.

याबाबत सन फार्मा कंपनीचे सीईसो गानोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांना तात्काळ उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे फ्लूगार्ड लॉन्च केले आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

हे औषध लवकरत लवकर बाजारात उपलब्ध होणार आहे. याआधीसुद्धा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने कोरोनाच्या उपचारांसाठी अँटीव्हायरल औषध फेविपिराविर हे बाजारात दाखल केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध दिले जात आहे. या औषधांच्या टॅबलेट्च्या एका पाकिटाची किंमत ३ हजार ५०० रुपये एवढी आहे.