“बाबरी मशीद होती आणि राहील इंशाअल्लाह”; भूमिपूजनाआधी ओवेसी यांचे ट्विट


नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येतील रस्तोरस्ती या सोहळ्यानिमित्त स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.पण एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याआधी सकाळी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ओवेसी म्हणतात की, बाबरी मशीद होती आणि राहील, इंशाअल्लाह!. बाबरी मशीद आणि बाबरी मशीद विध्वंस केल्याचा एक-एक फोटो ओवेसी यांनी हे ट्विट करताना शेअर केले आहेत.

दरम्यान, 9 नोव्हेंबर 2019 रोजी विवादित राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्यात आली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असाही आदेश दिला की अयोध्येतील पाच एकर जमीन मशीद बांधण्यासाठी देण्यात येईल.

दरम्यान प्रियंका गांधी यांच्या राम मंदिर भूमिपूजनावरील वक्तव्याची काल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दखल घेतली. ओवेसी प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, आनंद झाला की आता ते नाटक करत नाही. कट्टर हिंदुत्वाची विचारसरणी स्वीकारायची असेल तर ठीक आहे, पण ते बंधुत्वाच्या मुद्यावर पोकळ वक्तव्य का करतात? असा सवाल विचारला होता.

दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. प्रियंका गांधी यांनी लिहिले होते की, साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू राम नावाचा अर्थ आहे. राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचा संदेश आणि त्यांच्या आशीर्वादासोबत प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हा.