एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही, १० दिवसांवर क्वारंटाइन कालावधी


मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सत्ताधारी ठाकरे सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. त्यानुसार कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा होम क्वारंटाइन कालावधी १४ वरुन १० दिवस करण्यात आला आहे. त्याचबरोबर एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज लागणार नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास अनिवार्य असणार आहे. १२ तारखेपूर्वी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. १२ तारखेनंतर ज्यांना कोकणात जायचे आहे, त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ तारखेपूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. तर १० दिवसांचा क्वारंटाइन होण्याचा कालावधी हा करण्यात आला आहे. कोकणात जे जातील ते सगळे होम क्वारंटाइन होतील. आम्हाला १२ तारखेनंतर कोकणात जायचे असल्याची विनंती अनेकांनी केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून १२ तारखेनंतर जाणाऱ्यांना जाण्याच्या ४८ तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी दिली जाईल.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी सेवा देण्याची तयारी सुरु केली आहे. जे लोक एसटीने प्रवास करणार आहेत त्यांना ई-पासची गरज नाही. एसटी हाच तुमचा ई-पास आहे. पोर्टलमध्ये नोंद असल्याने प्रवाशांची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध असणार आहे, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.