फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने आणले जबरदस्त फीचर

खोटी माहिती, फेक बातम्यांवर लगाम घालण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वारंवार आपल्या प्लॅटफॉर्म्समध्ये बदल करत आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी नवनवीन फीचर देत आहेत. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने आधी मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणली, त्यानंतर लेबल फीचर देखील दिले आहे. आता याच मालिकेत व्हॉट्सअ‍ॅपने एक भन्नाट फीचर आणले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आता फेक न्यूज रोखण्यासाठी खास टूल सादर केले आहे. याचे नाव सर्च टूल आहे. या फीचरसाठी व्हॉट्सअ‍ॅपने गुगलसोबत भागीदारी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या या नवीन फीचरची माहिती कंपनीच्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

Image Credited – slashgear

हे फीचर कसे काम करते ते समजून घेऊया. समजा, तुम्हाला एखाद्या बातमीची लिंक आली असल्यास, त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला सर्च आयकॉनचे बटन दिसेल. यावर क्लिक करताच गुगल उघडेल व तुम्हाला त्या बातमी संदर्भातील इतर लिंक सुद्धा दिसतील. तुम्ही इतर लिंक वाचून ती बातमी खरी आहे की खोटी याची माहिती मिळवू शकाल. केवळ एका क्लिकवर हे शक्य होईल. जर व्हॉट्सअ‍ॅपच्या टीमने त्या बातमीला आधीच फॅक्ट चेक केलेले असल्यास, त्याची देखील लिंक तुम्हाला मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर ब्राझील, इटली, आयर्लंड, मॅक्सिको, स्पेन आणि अमेरिका या देशांमध्ये रोल आउट झाले असून, लवकरच भारतातील युजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध होईल. हे फीचर अँड्राईड, आयओएस आणि वेब अशा तिन्ही व्हर्जनसाठी असेल.