भारतीयांना मोठा झटका, आता H-1B व्हिसावर मिळणार नाही अमेरिकन फेडरल एजेंसीमध्ये नोकरी

अमेरिकेत नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या निर्णयाने झटके देत आहेत. आता एच-1बी व्हिसाबाबत ट्रम्प यांनी एक नवीन कार्यकारी आदेश जारी केला आहे. या अंतर्गत अमेरिकेच्या फेडरल एजेंसीज एच-1बी व्हिसावर आलेल्यांना नोकरी देणार नाही. ट्रम्प यांना या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

या आदेशात म्हटले आहे की, अमेरिकन फेडरल एजेंसी परदेशातून आलेल्या व खासकरून एच-1बी व्हिसा असणाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट अथवा सबकॉन्ट्रॅक्टवर नोकरीवर ठेवू शकणार नाही. ‘अमेरिकन नागरिक सर्वात प्रथम’ या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी जूनमध्ये एच-1बी व्हिसासह दुसऱ्या इतर कामासाठी असलेल्या व्हिसांना डिसेंबर 2020 पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांच्या या निर्णयाला पुढील काही महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीशी जोडले जात आहे.

एच-1बी व्हिसाची भारतीय आयटी प्रोफेशनल्स सर्वाधिक मागणी करत असतात. या अंतर्गत परदेशी कर्मचारी अमेरिकेत नोकरी करू शकतात. या व्हिसाद्वारे दरवर्षी हजारो भारतीयांना अमेरिकन कंपन्या नोकरी देतात.