सुशांत सिंह आत्महत्या; मुंबई पोलिसांवर बिहारच्या डीजीपींचा गंभीर आरोप


पाटणा – देशातील राजकीय तसेच प्रशासकीय वातावरण सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे अक्षरशः ढवळून निघाले आहे. त्यातच या दरम्यान दोन राज्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरुच आहेत. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीने केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीत लक्ष घातलेले असतानाच मुंबई पोलिसांवर बिहार पोलिसांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

सुशांतच्या खात्यातून रिया चक्रवर्तीने करोडो रुपये काढले असून याकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. पाटण्यामध्ये सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून त्याआधी सुशांतने हे टोकाचे पाऊल बॉलिवूडमधील गटबाजीमुळे उचलल्याचे बोलले जात होते. पण रियाने करोडो रुपयांची अफरातफर केल्याचा तसेच सुशांत मानसिकदृट्या आजारी असल्याचे सर्वांना सांगण्याची धमकी दिल्याची माहिती सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.

मुंबई पोलिसांना याचदरम्यान बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी प्रश्न विचारला आहे. सुशांत प्रकरणाच्या चौकशीवेळी त्याच्या पैशांवरून तपास का नाही केला, असा सवाल त्यांनी केला आहे. पत्रकारांना त्यांनी सांगितले की, सुशांतच्या खात्यात गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 50 कोटी रुपये आले होते. त्यात विशेष गोष्ट अशी की हे सर्व पैसे काढण्यात आले. 17 कोटी रुपये एका वर्षातच आले आणि त्यातील 15 कोटी रुपये काढण्यात आले. तपास करण्य़ासाठी हे पुरेसे कारण नाही का? आम्ही शांत बसणाऱ्यांमधील नाही. मुंबई पोलिसांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत.