भारतीयांची चिंता वाढवणारे WHO प्रमुखांकडून वक्तव्य


जिनिव्हा: कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे संपूर्ण जग हतबल झाले असून जगभरातील पावणे दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत ७ लाखांच्या जवळपास लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच जगभरातील अनेक देश या संकटापासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. तसेच या संकटाची रोकथाम करणाऱ्या प्रतिबंधक मोजक्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या जगभरातील अनेक देशांमध्ये होत असल्यामुळे ही लस लवकरात लवकर उपलब्ध होई, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण कोरोना प्रतिबंधक वरील लस आली तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार होईल का, असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस ऍडनम यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झाला आहे.

ऍडनम एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला संबोधित करताना कोरोनावरील रामबाण उपाय कदाचित कधीच सापडणार नसल्याचे म्हणाले आहेत. भारतात कोरोनाचा संक्रमणाचा वेग अतिशय जास्त असल्यामुळे त्यांना कोरोनाविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. आणखी बराच कालावधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुरळीत होण्यासाठी लागेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची तीन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या आकड्यात पाच पटीने वाढ झाली आहे. तर तिपटीने मृतांचा आकडा वाढल्याची आकडेवारी ऍडनम यांनी सांगितली.

सर्व देशांना कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे टेड्रोस ऍडनम आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीचे प्रमुख माईक रायन यांनी आवाहन केले. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ करा आणि कोरोना चाचण्या करा, असे आवाहन त्यांनी केले. मास्कचा लोकांनी आवर्जून वापर करावा. मास्क वापरणे म्हणजे लोकांच्या एकजुटतेचे प्रतीक व्हावे, असे टेड्रोस म्हणाले.

कोरोनावरील बहुतांश लसी सध्याच्या घडीला तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. लवकरच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण कोणताही रामबाण उपाय सध्या तरी दिसत नाही आणि तसा उपाय कधी सापडेल, असे वाटत नाही, अशी भीती शब्दांत टेड्रोस यांनी व्यक्त केली. कोरोना संक्रमणाचा वेग भारत आणि ब्राझीलमध्ये अतिशय जास्त असल्यामुळे मोठा संघर्ष त्यांना करावा लागेल. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचे ते म्हणाले.