शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन अयोध्येत दाखल झाले शिवसैनिक


अयोध्या – बुधवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे भूमिपूजन केले जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन या भूमिपूजनासाठी शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी विध्वंसानंतर या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठले होते. पण शिवसेना या पक्षाची या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. त्यातच बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला गर्वसे कहो हम हिंदू है हा नारा याच काळातील होता. त्यामुळे अयोध्या आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनोखे नाते असल्यामुळेच प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केले जात आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन दाखल झाले आहेत.