रशिया भारताला देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस!

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. आपण कोरोना प्रतिबंधक लस शोधल्याचा दावा देखील रशियाने केला आहे. रशिया ऑक्टोंबरपासून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस लसीकरणाची योजना राबवणार आहे. म्हणजेच रशिया कोरोना लसीच्या बाबतीत अमेरिका, ब्रिटन आणि चीनच्याही पुढे गेला आहे. रशियाचा जर हा दावा सत्य असेल, तर भारताला देखील ही लस मिळू शकते.

एका रिपोर्टनुसार, रशियाच्या अधिकाऱ्यांनी 10 ऑगस्टपर्यंत मुख्य लसीला मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा उद्देश भारत, ब्राझील आणि सौदी अरेबिया सारख्या देशांसोबत मिळून लसीच्या विक्रीबाबत करार करण्याचा आहे. भारतासह अनेक देशांनी ही लस खरेदी करण्यास रस दाखवला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रशियाने सांगितले की, सप्टेंबरमध्ये लसीचे उत्पादन सुरू करणार असून, ऑक्टोंबरमध्ये देशभरात लसीकरण केले जाईल. खास गोष्ट म्हणजे लसीच्या ट्रायलमध्ये गती येण्यासाठी रशियाच्या वैज्ञानिकांनी स्वतःला देखील लस टोचली आहे. असे असले तरी अमेरिका-ब्रिटनच्या तुलनेत रशियाने आपल्या लसीबाबत मर्यादित माहिती जगाला दिली आहे. रशियाची ही लस देशातील काही श्रीमंताना देण्यात देखील आल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

रशियाचे व्यापारमंत्री डेनिस मॅन्तुरोव्ह म्हणाले की, एक महिन्यात रशिया लसीचे लाखो डोस निर्माण करू शकते. एक कंपनी रशियात तीन ठिकाणी उत्पादनाची तयारी करत आहे.