राम गोपाल वर्माकडून अर्णब गोस्वामींना खलनायकाची उपमा


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेली धूसफुस चव्हाट्यावर आली. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडू लागल्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. याचदरम्यान आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत येणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सुशांत आत्महत्याप्रकरणी वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा खलनायक असा उल्लेख करत ताशेरे ओढले आहेत.

याबाबत राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट करत अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामींसारख्या खलनायकांविरुद्धदेखील आवाज उठविला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. राम गोपाल वर्माच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांना ट्रोलदेखील केले आहे.

माझा आदित्य चोप्रा, करण जोहर, महेश भट्ट, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह अनेकांना एक सल्ला आहे. हिरो केवळ चित्रपटांसाठी तयार करणे आणि चित्रपटात हिरो होणे एवढेच गरजेचे नाही. तर अर्णब गोस्वामीसारख्या खलनायकाविरुद्ध आवाज उठविणेदेखील तेवढेच गरजेचे असल्याचे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. त्याचबरोबर ते आपल्याविषयी असे दाखवत आहेत जसे काय आपण गुन्हेगार, बलात्कारी आहोत. त्यामुळे अशा काळात या लोकांचा थेट सामना करण्याची गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांना अनेकांनी खडेबोल सुनावले आहेत. तुमच्या लोकांपेक्षा ते नक्कीच चांगले आहेत. निदान त्यांच्यात माणुसकी तरी आहे. तुमच्यामध्ये तर तीदेखील नसल्याचे एका युजरने सुनावले आहे.