नेपाळच्या पावलावर पाक, नवीन नकाशात काश्मिर, जुनागढवर ठोकला दावा

काही दिवसांपुर्वी नेपाळने भारतासोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय नकाशा जारी केला होता. आता पाकिस्तानने देखील त्याच पावलांवर पाऊल टाकत नवीन राजकीय नकाशा जारी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका बैठकीत देशाचा नवीन नकाशा जारी करत लडाख, जम्मू-काश्मिरच्या सियाचिनसह गुजरातच्या जूनागढवर देखील दावा ठोकला आहे. भारत सरकारने मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मिरला लागू असलेले कलम 370 हटवले होते. या घटनेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने पाकने हा नकाशा जारी केला आहे.

इम्रान खान यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशाचा एक नवीन राजकीय नकाशा जारी केला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने येथे बेकायदेशीररित्या निर्माण केले आहे. याशिवाय सर क्रिकबाबत वाद असतानाही पाकिस्तानने याला देखील आपल्या नकाशात दाखवले आहे.

जम्मू-काश्मिर आणि लडाखवर पाकिस्तान आधीपासूनच दावा करत आला आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी पाकने गुजरातच्या जुनागढला देखील आपला भाग असल्याचे म्हटले आहे. सोबतच ज्या भागावरून भारत-चीनमध्ये वाद आहे, त्याला अनडिफाइंड फ्रंटियर म्हटले आहे. रिपोर्टनुसार पाकिस्तान हा नकाशा संयुक्त राष्ट्रात देखील सादर करणार आहे.