मुंबईकरांनो अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; महानगरपालिकेचे आवाहन


मुंबई – मुंबई शहर व उपनगरात आज भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून दुपारी १२.४७ च्या सुमारास समुद्रात भरती येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन बृह्नमुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात उत्तरेस तयार होण्याची शक्यता त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ४ आणि ५ ऑगस्टला किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा (रेड अर्लट) देण्यात आला आहे.

मंगळवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात शक्यता आहे.