मागील २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ‘या’ व्यक्तिला भूमिपूजनाचे निमंत्रण


नवी दिल्ली – ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची अयोध्येत तयारी जवळपास पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून मान्यवरांना यासाठी निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये मागील २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मोहम्मद शरीफ हे मागील २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांना यासाठी राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केल्याची माहिती राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता मोहम्मद शरीफ हे गेल्या २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. त्याचा नातेवाईकांनी बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. शरीफ तेव्हापासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. ‘शरीफ चाचा’ या नावाने स्थानिक लोकांमध्ये ते ओळखले जातात. आपण जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत राहणार असल्याचे शरीफ चाचा म्हणतात.