कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण


बंगळुरु – देशावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अधिकच गहिरे होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह आता राजकीय नेते देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले जात आहे. त्यातच कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः सिद्धरामय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी क्वारंटाइन होण्यासही सांगितले आहे. त्याचबरोबर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बिप्लब कुमार देब यांनी ट्विटरद्वारे दिली असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये माझ्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य काही जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे. माझीदेखील कोरोना चाचणी झाली असून चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. काळजीसाठी मी होम आयसोलेशमध्ये असल्याचे म्हटले आहे. आज बिप्लब कुमार देब यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यांनी आगामी 7 दिवसांसाठी क्वारंटाईन होण्याचा त्याचबरोबर नियमांनुसार वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे.