Jubilant ने लाँच केले कोरोनाला रोखणारे औषध


कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे संपूर्ण जग हतबल झाले असून जगभरातील पावणे दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत ७ लाखांच्या जवळपास लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच जगभरातील अनेक देश या संकटापासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. तसेच या संकटाची रोकथाम करणाऱ्या प्रतिबंधक मोजक्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या जगभरातील अनेक देशांमध्ये होत असल्यामुळे ही लस लवकरात लवकर उपलब्ध होई, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांना दिलासा देणारी माहिती समोर आली असून कोरोना रुग्णांसाठी Jubilant लाइफ सायन्सेस यांची सहाय्यक कंपनी Jubilant जेनेरिक्स यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लॉन्च केल्याची माहिती दिली असून याबाबत मिळालेल्या माहितानुसार JUBI-R या नावाने भारतात हे इंजेक्शन विकले जाणार आहे. ज्याची किंमत जवळपास 4700 रुपये असणार आहे. औषध भारतासह 127 देशांमध्ये हे उपलब्ध करण्यात येणार आहे.

कंपनीकडून कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी 100 एमजी वायल 1000 रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार असून हे औषध कंपनीच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कअंतर्गत या रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्युबिलेंटने गिलीड सायन्सेस लिमिटेडसह मे महिन्यात एक नॉन-एक्सक्लुसिव्ह करार केल्यानंतर रेमडेसिवीर रजिस्ट्रेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्रीची परवानगी कंपनीला मिळाली आहे. रेमडेसिवीर कोरोना रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्यामुळेच या इंजेक्शनचा खूप जास्त फायदा होणार आहे. यासंदर्भातील वृत्त फायनान्शियल एक्सप्रेसने दिले आहे.

कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधे शास्त्रज्ञांना सापडल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळली होती. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव ही औषधे रोखू शकतात. हे संशोधन सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोनाच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना व्हायरसची प्रतिकृती रोखण्यासाठी औषधांचे विश्लेषण केले गेले. लॅब टेस्टमध्ये अँटीव्हायरल अ‍ॅक्टिव्हिटी असलेले 100 रेणू (molecules) आढळले. हा रिसर्च नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधनानुसार, कोरोना रुग्णांसाठी ही औषधे सुरक्षित आहेत. तसेच यापैकी चार कंपाऊंड हे रेमडेसिवीरसोबत एकत्रित करून कोरोनाच्या उपचारासाठी वापरली जाऊ शकतात.