चीनला आणखी एक मोठा झटका, यंदा आयपीएलमध्ये स्पॉन्सर नसणार व्हिवो

आयपीएलचा मुख्य स्पॉन्सर असलेल्या व्हिवो कंपनीने यावर्षीसाठी आयपीएल स्पॉन्सरशिप न करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी संघटना, स्वदेशी जागरण मंच यांच्या विरोधानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र व्हिवो पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी पुन्हा एकदा प्रमुख स्पॉन्सर असेल व बीसीसीआय आणि व्हिवोचा करार 2023 पर्यंत कायम असेल. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी बीसीसीआय लवकरच नवीन स्पॉन्सरची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. यामुळे व्हिवोला आयपीएलच्या स्पॉन्सर यादीतून हटवावे या मागणीने जोर पकडला होता. असे असले तरी आयपीएल गर्व्हर्निंग काउसिंलने या चीनी कंपनीसोबत करार मोडला नव्हता. बीसीसीआयच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाला होता.

आता व्हिवोने या वर्षीसाठी आयपीएलच्या स्पॉन्सरशिपपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिवो करारांतर्गत बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देते. हा करार 5 वर्षांचा होता व 2022 साली संपणार होता. मात्र आता यंदाचे वर्ष गाळून हा करार एकप्रकारे 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, आयपीएल 2020 च्या सत्राची सुरुवात 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाईल.