… म्हणून व्यापारी संघाने केली आयपीएल स्थगितीची मागणी, अमित शाहांना पाठवले पत्र

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. मात्र असे असले तरीही बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठी चीनी कंपनी व्हिवोला स्पॉन्सर म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. अखिल भारतीय व्यापारी संघाने बीसीसीआयच्या या निर्णया विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांन पत्र लिहिले आहे.

व्यापारी संघाने आयपीएलच्या या सत्रा त्वरित स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी अमित शाह आणि जयशंकर यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, बीसीसीआयने काही दिवसांपुर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देऊ इच्छितो. बीसीसीआयने चीनी कंपनी विवोला दुबईमध्ये आयोजित होणाऱ्या आयपीएलचे स्पॉन्सर म्हणून कायम ठेवले आहे. अशावेळी जेव्हा चीन भारताच्या सीमेवर आपल्या देशाच्या भावनेशी खेळत आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर भारतचे पालन करत आहे, अशा स्थितीमध्ये बीसीसीआयचा हा निर्णय सरकारच्या व्यापक धोरणाच्या विरोधात आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयाचा स्वदेशी जागरण मंचाने देखील विरोध केला आहे. दरम्यान, यंदाचे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये पार पडणार आहे. याशिवाय बीसीसीआय आणि विवोचा करार वर्ष 2022 पर्यंत आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा करार मोडल्यास बोर्डाला मोठे नुकसान होऊ शकते.