कोरोना संक्रमणाचा वेग बीसीजी लसीमुळे होईल कमी; तज्ज्ञांचा दावा


नवी दिल्ली – जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी अनेक देशातील शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यातच दिलासादायक बाब अशी की ब्रिटेन, अमेरिका, चीन आणि रशिया या देशांमध्ये निर्माण होत असलेल्या लसी परिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. कोरोना प्रतिबंधक लस जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. त्यातच साइंस एडवांसेज जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार कमीत कमी पहिल्या ३० दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग बीसीजी लसीने कमी करू शकतो.

यासंदर्भात अमेरिकन एसोसिएशन फॉर द एडवांसमेंट ऑफ साइंसने दिलेल्या माहितीनुसार अशा ठिकाणी बीसीजी लसीकरण अनिवार्य आहे, ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पहिल्या तीस दिवसातील संक्रमण आणि मृत्यूदर जास्त आहे. त्याचबरोबर संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत २९ मार्चला कोरोनामुळे २ हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला असून जर त्यावेळी बीसीजी लसीकरण केले असते तर हा आकडा ५०० पेक्षा कमी झाला असता. १३४ देशांमधील माहितीच्या आधारे संशोधकांनी हे विश्लेषण केले होते.

बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान भारत आणि चीनमध्ये सुरुवातीपासून आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये यामुळेच कमी आहे. कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी बीसीजी लसीमुळे मदत होते. जन्मल्यानंतर १५ दिवसांच्या आत लहान मुलांना बीसीजीची लस दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. बीसीजी लसीचे भारतातही कोरोना रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. याअंतर्गत बीसीजी लस २५० रुग्णांना देण्यात येणर आहे. याचे परिणाम दिसून येण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

(टिप : वरील बाबी संशोधन अथवा अभ्यासतून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचा दावा माझा पेपर यातून करत नाही.)