खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण


अमरावती – राज्यावर ओढावलेल्या कोरोना या जीवघेण्या विळख्यात आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते देखील अडकू लागले आहेत. त्यातच आता खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही कोरोना झाला आहे.

राणा कुटुंबातील ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नवनीत राणांच्या कुटुंबाबाबत ही माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगरमध्ये असलेल्या त्यांच्या घरी गर्दी जमा होत आहे. पण आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटात आज माझे कुटुंब सापडले आहे. माझे आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, भाची आणि एका अंगरक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. आमची विचारपूस करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तरीही या काळात सगळ्यांनीच योग्य ती काळजी घ्यावी. गर्दी करु नये, आपल्याला कोरोना विरोधातील लढाई जिंकायची असल्याचे आवाहन रवी राणा यांनी केले.