कोरोना वॉरिअर्स बहिणींसोबत रोहित पवारांचे अनोखे रक्षाबंधन


पुणे – आज देशभरात कोरोनाच्या संकट काळात देखील बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण ‘रक्षाबंधन’ उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच यंदा अनोख्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील रक्षाबंधन साजरा केला आहे. वैद्यकीय कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढ्यात अहोरात्र परिश्रम घेत कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. रोहित पवार यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोरोना वॉरिअर्स बहिणींची खास भेट घेतली.

आज पुण्यातील ससून आणि नायडू रुग्णालयांना रोहित पवार यांनी भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरा केला आहे. कोरोनाचे सणांवर देखील सावट आहे. अशा संकटसमयी लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीव धोक्यात घालून कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील बहिणींकडून रोहित पवार यांनी राखी बांधून घेतली आहे.

आपल्या अनेक भगिनी राज्यभरात कोविड योद्धे म्हणून काम करतात. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे आज प्रतिनिधीक स्वरूपात ससून आणि नायडू हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली, असे ट्विट ही रोहित पवार यांनी केले आहे.