धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल


पुणे – भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पण संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हा गुन्हा राजकीय षडयंत्रातून दाखल झाल्याचा दावा असून आपल्याला न्याय मिळावा अशी भूमिका मांडली. आपण यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

आपल्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिल्याची तक्रार काल चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काकडे यांनी याबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संजय काकडे म्हणाले, माझ्या विरोधात मेव्हणा युवराज ढमाले याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजल्यावर वाईट वाटले आहे. मी ढमाले याला गेल्या तीन वर्षात केवळ दोनदाच भेटलो आहे, ते ही एकदा माझ्या वाढदिवसादिवशीच. पण हे एक राजकीय षडयंत्र आहे. माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी किमान पोलिसांनी मला विचारणे गरजेचे होते. पण कोणत्याही प्रकारची कल्पना न देताच पोलिसानी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातून त्यांच्यावर राजकीय दाबाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे मी लवकरच या षडयंत्राविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यातून सत्य परिस्थिती समोर येईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचेही काकडे यावेळी म्हणाले.