ड्रग्स तस्करीच्या आरोपाखाली अटक मांजर चक्क हाय सिक्यूरिटी सेलमधून फरार

श्रीलंकेतील एक विचित्र आणि हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे कथितरित्या ड्रग्स आणि सिम कार्डची तस्करी करण्याच्या आरोपाखाली एका मांजरीला अटक करण्यात आले होते. मात्र आता ही मांजर हाय सिक्यूरिटी सेलमधून देखील फरार झाली आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की मांजरीला जेल सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेलिकाडा जेल येथे पकडले होते. या मांजरीच्या गळ्यात अडकवलेल्या छोट्या प्लास्टिक बॅगमध्ये दोन ग्रॅम हिरोईन, 2 सिम कार्ड आणि एक मेमरी चिप आढळली.

पकडल्यानंतर वेलकांडाच्या हाय सिक्युरटी जेलमध्ये मांजरीला ठेवण्यात आले होते, तेथूनही मांजर फरार होण्यास यशस्वी झाली. जेल प्रशासनाने मात्र अद्यापविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही.  जेल प्रशासनाने सांगितले की, मागील काही आठवड्यात लोकांकडून जेलच्या भिंतीवर ड्रग्स, सेल फोन आणि फोन चार्जरची छोटी पाकिटे फेकण्याच्या घटना वाढल्या आहेत.

दरम्यान, श्रीलंका मागील काही वर्षांपासून ड्रग्सच्या समस्येशी लढत आहे. मागील आठवड्यातच कोलंबो येथे एका गरुडाला पकडण्यात आले होते. हे गरुड कथितरित्या तस्करांद्वारे ड्रग्स पोहचविण्यास जात होते.