न्यायालयाने फेटाळला अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज


मुंबई: ठाणे पोलिसांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्षाच्या तडीपारीची नोटीस बजावली आहे. अविनाश जाधव गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी आंदोलन सुरु होते. पोलिसांनी त्यांना हे आंदोलन करत असताना ताब्यात घेतल्यानंतर अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अविनाश जाधव यांचा जामीन ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने फेटाळल्यामुळे मनसेला एक प्रकारचा धक्काच असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान मनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते. न्यायालयाच्या सुनावणीबाबत महिती देताना नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, ३५३ चे कलमांतर्गत अविनाश जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे ३५३ या कलमातील गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होते. त्यामुळे याबाबत सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आदेश दिल्यामुळे अविनाश जाधव यांना 6 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशानूसार आम्ही आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांना जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असून 6 ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.