काँग्रेसचा सवाल; शहांच्या शेजारी बसणारे मोदी क्वारंटाईन होणार का?


नवी दिल्ली: देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या रोगाची लागण होणाऱ्यांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 17 लाखांचा टप्पा पार केला असून अद्यापही अनेकांना कोरोनाची लागण होतच आहे. त्यातच काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून दिली.

शहांनी कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची चाचणी करुन स्वत: क्वारंटाईन होणार का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

याबाबत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास ट्विट करत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान बुधवारी (29 जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत, असा सवाल श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे.