चिनी ड्रॅगनची वळवळ कायम; भारताच्या दिशेने तैनात केली H-6 बॉम्बर विमाने


नवी दिल्ली – काल मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी कमांडर स्तरची पाचव्या फेरीची बैठक झाली. त्याचवेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने काशगर एअर बेसवर H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले आहे.

काशगर एअर बेस पूर्व लडाखमधील पँगाँग लेकपासून ६९० किलोमीटर अंतरावर आहे. चिनी सैन्य या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नसल्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. काशगर एअर बेसवर सहा शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज असल्याचे वृत्त फास्ट मेल न्यूजने दिले आहे.

H-6 ही बॉम्बर विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असून हा विमानतळ लडाखपासून ६०० किमी अंतरावर आहे. H-6 विमानांचा सहा हजार किलोमीटर हा पल्ला आहे. त्याशिवाय १२ शियान JH-7 फायटर बॉम्बर आणि चार J11 / 16 फायटर विमाने तैनात केली आहेत. अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या H-6J आणि H-6G विमानांनी युद्धसराव केला. H-6J विमाने YJ-12 जहाजविरोधी क्रूझ मिसाइल वाहून नेण्यास सक्षम आहे.

त्याचबरोबर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. या भागात चिनी सैन्याच्या हालचाली मागच्या काही आठवड्यांपासून दिसत होत्या. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला हे वृत्त दिले आहे.

चिनी सैनिकांची लिपूलेख पास, उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये संख्या वाढली असल्याचे वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी सांगितले. लिपूलेख पास मानसरोवर यात्रेच्या मार्गामध्ये आहे. भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किमीचा रस्ता बांधला. तेव्हापासून हा मार्ग चर्चेत आहे. कारण नेपाळने यावर आक्षेप घेतला. नेपाळने आपल्या नकाशात बदल केला आहे. कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरा हे भारतीय भूभाग नकाशात आपल्या हद्दीत दाखवले आहेत. नेपाळमधील ओली सरकारच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ संबंध खराब झाले आहेत.