सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात अमृता फडणवीस यांची उडी


मुंबई – पाटण्याहून मुंबईत अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महानगरपालिकेने रविवारी रात्री क्वारंटाइन केले. त्यावरून आज सकाळपासून बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच या प्रकरणाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिहार पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नसल्याचे म्हणत त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर भाजपा नेते राम कदम यांनीदेखील टीका केली. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईतील माणुसकी गमावली असून आता मुंबईत निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी राहणे अजिबात सुरक्षित नसल्याचे अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

दरम्यान, बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णयावर स्पष्टीकरण देताना मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, त्यांचे होम क्वारंटाइन नियमाला धरुन केले. देशांतर्गत ते प्रवासी असल्याने त्यांना राज्य शासनाच्या कोविड १९ संदर्भातील नियमावलीनुसार होम क्वारंटाइन करणे आवश्यक असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. आमच्या पथकाने त्यांना थांबलेल्या विश्रामगृहावर पोहोचून सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.