रक्षाबंधनचे औचित्य साधत अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा


अभिनेता अक्षय कुमारने रक्षाबंधनचे औचित्य साधत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयने सोशल मीडियावर या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला असून चित्रपटाचे ‘रक्षाबंधन’ हेच नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. अक्षयसोबत या पोस्टरमध्ये त्याच्या चार बहिणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातावर राख्यासुद्धा बांधलेल्या आहेत.

या चित्रपटाची ‘बस बहनें देती है १००% रिटर्न’ अशी टॅगलाइन आहे. त्याचबरोबर अक्षयने या पोस्टरला तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत सर्वांत कमी वेळात साइन केलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट मी माझी बहीण अल्का हिला आणि जगातील सर्वांत खास बहीण-भावाच्या नात्याला समर्पित करतो, असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाची पटकथा हिमांशू शर्माने लिहिली असून याचे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.