मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार टीक-टॉक ?, ट्रम्प यांच्याशी झाली चर्चा

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर सध्या अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील टीक-टॉकवर बंदी घालणार असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट बाईट डान्सकडून टिक-टॉक खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मायक्रोसॉफ्टने याविषयी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर टीक-टॉकच्या अमेरिकन ऑपरेशन्सला खरेदी करण्याविषयी चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली.

ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेची चिंता व्यक्त करत अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याची धमकी दिली होती. त्याआधी अमेरिकेचे सचिव माइक पॉम्पिओ यांनी टीक-टॉकवर मोठी कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते.

मायक्रोसॉफ्ट टीक-टॉकचे अमेरिकन ऑपरेशन्स खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता ट्रम्प यांच्याद्वारे अ‍ॅपवर बंदी घालण्याची चर्चा थोडीफार मागे पडली आहे. दरम्यान, भारताने देखील या अ‍ॅपवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून बंदी घातलेली आहे.