बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


पाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात राज्यातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले असून या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधील माफियांच्या दबावाखाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा बिहारचा सुपुत्र होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत तळ ठोकून असलेल्या बिहार पोलिसांना योग्य सहकार्य केले जात नसल्याची टीकाही सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड माफिया आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

शनिवारी निर्माता रुमी जाफरीची बिहार पोलिसांनी चौकशी केली. रिया आणि सुशांत यांना घेऊन रुमी जाफरी हे एका चित्रपटाची निर्मिती करणार होते. पण लॉकडाउनमुळे चित्रपटाचे काम सुरु होऊ शकले नाही. नवी मुंबईतील उल्वे येथे जाऊन बिहार पोलिसांनी सुशांत, रिया आणि शोविकच्या कंपनीची नोंदणी असलेल्या ठिकाणी चौकशी केली.

दरम्यान उद्धव ठाकरेंवर शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ट्विट करुन आरोप केला आहे. काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जातो आहे. असे करुन बिहारमध्ये काँग्रेस जनतेला काय तोंड दाखवणार? असाही प्रश्न सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली होती. पण घराणेशाही आणि सिनेसृष्टीतील गटबाजीचा सुशांत सिंह राजपूत हा बळी असल्याचाही आरोप झाला. दरम्यान असे आरोप झाल्यानंतर त्या अनुषंगानेही चौकशी करण्यात आली आहे.