अयोध्येतील भूमिपूजनाचे असदुद्दीन ओवेसींना निमंत्रण


हैदराबाद : आता अवघे काही दिवस अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शिल्लक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या 5 ऑगस्टला भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पण त्यामुळे देशातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. त्यातच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावरून टीका केल्यानंतर आता तेलंगणा भाजपचे नेते आणि प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी ओवेसी यांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

राव म्हणाले, कायम राम मंदिराला ओवेसी आणि कम्युनिस्ट नेते हे विरोध करत आले आहेत. केवळ धर्मनिरपेक्षतेचा खोटा मुखवटा चढवून अशा विचारांच्या मंडळींनी देशात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता काय आहे हे पाहायचे असेल तर ओवेसी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. मी त्यांना निमंत्रित करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम धार्मिक असल्याने त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊ नये, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले होते. त्यापार्श्वभूमीवर हे निमंत्रण त्यांना पाठवण्यात आले आहे.