सीरमने कोरोनाविरोधात थोपटले दंड; केला सर्वात आधी आणि मोठ्या प्रमाणावर लस तयार करण्याचा दावा


पुणे – संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या दहशतीखाली असून या दुष्ट संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार असल्याचा दावा पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी केला आहे.

अदार पूनावाला म्हणाले, असे फार कमी लोक आहेत, जे एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी किमतीत कोरोना लसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतात. कोरोना लसीच्या पहिल्या खेपेसाठी मला देश-विदेशातून अनेक नेत्यांचे फोन येत आहेत. मला त्यांना समजून सांगावे लागत आहे, की मी तुम्हाला अशीच लस देऊ शकत नाही.

एप्रिल महिन्यातच उघडपणे लस तयार करण्याचा दावा ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तैयार करण्याच्या कामात लागलेल्या सीरम इंस्टिट्यूटने केला होता. कंपनीत आता प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. पण अद्याप ही लस किती मोठ्या प्रमाणावर तयार होणार हे स्पष्ट झालेले नाही. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीची आवश्यकता भासणार आहे. अशात भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही पूनावाला विभागणी करू शकतात.

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत. ही लस तयार करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची एस्ट्राजेनेकाला साथ मिळाली आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाल म्हणाले, की क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठी त्यांना लवकरच परवानगी मिळण्याची आशा आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यावरील मानवी चाचणीला सुरुवात करण्यात येईल.

अदार पूनावाला पुढे म्हणाले, परवानगी मिळताच आम्ही लसीचे परीक्षण सुरू करू. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आम्ही लसीचे उत्पादनही सुरू करू. पुनावाला यापूर्वी म्हणाले होते, की आम्ही याच वर्षाच्या अखेरपर्यंत लस तयार करू अशी आशा आहे. त्याचबरोबर घाई करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित लस तयार करणे, हा कंपनीचा उद्देश आहे.